भुसावळ (प्रतिनिधी )-
दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गॅरेज व्यावसायीकावर चाकूने हल्ला करीत लुटल्याची घटना खेडी रोडवरील कालिका माता मंदिराजवळ मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. आरोपींनी गॅरेज व्यावसायीकाच्या हातातील मोबाईल तसेच दोन हजारांची रोकड लांबवत पळ काढला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींनी थेट पोलिस उपअधीक्षकांच्या कार्यालयामागेच लूट केल्याने पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून संशयीतांच्या चौकशीला सुरूवात केली आहे.
लूट प्रकरणी गॅरेज व्यावसायीक वैभव राजू महाजन 19, खेडी बु.॥, ता.भुसावळ, जि.जळगाव यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून चार संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . महाजन यांच्या तक्रारीनुसार, खेडी रोडवरील कालिका माता मंदिराजवळ दोन दुचाकीवरून चार संशयीत अचानक आले व त्यांनी आपल्याला खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच पोटावर चाकूचे वार करून जखमी करीत तीन हजार रुपये किंमतीचा एम.आय.कंपनीचा मोबाईल तसेच दोन हजारांची रोकड व पाकिट लांबवून पळ काढला. दरम्यान, अत्यवस्थ अवस्थेतील जखमीला नगरसेवक पिंटू कोठारी यांनी रात्री गोदावरी हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ हलवले. सहा.निरीक्षक मंगेश गोंटला यांनी तेथे जावून जखमीचा जवाब नोंदवल्यानंतर मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. चाकू हल्ल्याच्या घटनेचे वृत्त कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील, विकास सातदिवे, सुभाष साबळे आदींनी त्वरीत घटनास्थळी जावून भेट घेतली .



