भुसावळ (प्रतिनिधी )-
अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी दिनांक १० जुलै रोजी, शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत सोमवार १३ जुलै रोजी ट्रॅामा केअर सेंटर भुसावळ येथे भेट देऊन आरोग्य व इतर यंत्रणेविषयक कामकाज तथा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी आमदार संजय सावकारे, उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलिस अधिक्षक गजानन राठोड, तहसीलदार दीपक धिवरे, डॉ. देवश्री घोषाल व मान्यवर उपस्थित होते.
मुबलक मनुष्यबळ व साधन सामुग्री असतांना सुद्धा भुसावळात फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व रेल्वे हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल केले जाताय, वसतिगृहात ऑक्सिजनची तोडकी व्यवस्था असून रेल्वे हॉस्पिटलमध्ये मोजक्याच सुविधा आहे. स्वतः कोरोना योध्या असलेल्या डॉक्टरांना व जवानांना सुविधा मिळाल्या नाही. बेड नसल्या कारणाने गोदावरीत ऍडमिट करा असे सांगण्यात आले. लाखो रुपयांचा निधी खर्च करीत आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी ट्रामा सेंटर उभे राहिले तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उदघाटन केले, परंतु कोविड सारख्या आजरावर सुविधा असतांना सुद्धा उपचार सुरू झाले नाही. या केंद्राला मिळालेले ३० ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा वापरात आणू शकले नाही. हे ट्रामा सेंटर कोविड उपचार केंद्र म्हणून लवकर सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती याची त्वरीत दखल घेवून आज पाहणी करण्यात आली.
ट्रामा सेंटरला सुसज्ज करण्यासाठी योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांना परत रुजू करून कोविड रुग्णालय सुरू व्हावे कारण भुसावळात इतर ठिकाणी असलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. डॉक्टर, नर्स व पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आरामाची गरज आहे. नागरिकांच्या पैश्यातून बनलेल्या वास्तूचा उपयोग होत नसेल तर त्याचा फायदा नाही, जिल्हाधिकारी साहेबांनी यातून मार्ग काढावा ही अपेक्षा आहे असे प्रा.धिरज पाटील यांनी कळविले आहे.



