भुसावळ (प्रतिनिधी )-
लॉण्ड्रीचा पत्ता विचारल्यानंतर पत्ता माहित नाही, असे उत्तर दिल्याच्या कारणावरून एका १९ वर्षीय तरुणावर रेल्वे रुग्णालयाजवळील ख्रिश्चन कब्रस्थानजवळ गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.नगरसेवक राजकुमार खरातसह अन्य ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.या आरोपींना भुसावळ सत्र न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
स्थानिक आंबेडकर नगर मधील आदित्य संजय लोखंडे (वय १९) या तरुणावर आरपीडी रस्त्यावरील कब्रस्थानजवळ ७ संशयित आरोपींनी गोळीबार तसेच फायटरने मारहाण करीत जखमी केले होते.तसेच लोखंडे यांची दुचाकी तसेच मोबाईल घेवून पसार झाले होते. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शहर पोलिसांच्या तीन पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता.पथकाने संशयीत आरोपी सुरज सपकाळे ( वय १९), अमोल खिल्लारे (वय २५), कल्पेश कासे (वय२५), आतीश खरात (वय २५), हंसराज खरात (वय१९) व नगरसेवक राजकुमार खरात (वय २७) या सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी काही संशयीतांची उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कसून चौकशीही केली होती.नगरसेवक राजकुमार खरात यांचे वडील तथा भाजप नगरसेवक रविंद्र(हम्प्या)खरात यांच्यासह त्यांचा भाऊ,दोन मुले व गल्लीतील एका तरूणाचा काही महिन्यांपुर्वीच पुर्ववैमन्यासातून सामुहिक हत्याकांड झाले होते.
य आदित्य लोखंडे या तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी खरात भावंडांसह सहा आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला कट्टा,नेमके हल्ल्याचे कारण आदींचा तपास करण्यात येणार आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विनोदकुमार गोसावी हे करीत आहेत.



