चिंताजनक कोरोना भुसावळात दाखल : भुसावळसह अमळनेर व मलकापूरच्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह ; भुसावळकरांच्या चिंतेत वाढ : आरोग्य विभागाकडून उपाययोजनांना वेग : नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन ;

जळगाव (प्रतिनिधी )-

गेल्या महिन्यापासून कोरोना पासून लांब असलेल्या भुसावळात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र अचानक शनिवार-२५ एप्रिल रोजी आलेल्या अहवालात भुसावळातील एका भागातील ४३ वर्षीय महिलेसह मलकापूर, जि.बुलढाणा येथील ६५ वर्षीय महिला व अमळनेरातील ४३ वर्षीय पुरूषाचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने प्रशासन पुन्हा हादरले आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या आता तब्बल १४ वर पोहोचली असून एक रुग्ण बरा होवून घरी परतला आहे तर तिघांचा मृत्यू ओढवला असून दहा रुग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.
प्रशासनाकडून विविध उपाययोजनांना वेग
शहरातील ४३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने शहरवासीयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागातर्फे महिला राहत असलेल्या परीसरात आता सॅनिटायजेशन करण्यात येत असून त्या परीसरातील रहिवाशांचा सर्वे करण्यात येणार आहे शिवाय त्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेवून त्यांनादेखील उपचारार्थ हलवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
भुसावळकरांनो आता तरी खबरदारी घ्या ; सावध व्हा; घरातच बसा
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महिनाभरापासून पोलिस व प्रशासन नागरीकांना घरातच बसण्याचे आवाहन करीत असताना काही लोक मात्र विनाकारण क्षुल्लक-क्षुल्लक गोष्टींसाठी बाहेर पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी अक्षयतृतीया असल्याने शहरातील विविध भागात सोशल डिस्टन्स न पाळता नागरीकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. शहरातील म्युन्सीपल हायस्कूल बाहेर गर्दी पांगवण्यासाठी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्यासह पथकाने पुढाकार घेतला शिवाय अनेकांना दंड देखील केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *