भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील प्रांत यांचे दालनात आज दि.२० एप्रिल रोजी कोरोना कोविड-१९ च्या जनजागृती बाबत बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस आमदार संजय सावकारे ,प्रांत रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,
मुख्याधिकारी श्रीमती करूणा डहाळे ,बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जळगाव यांचे दि.१९एप्रिल रोजाच्या आदेशान्वये शहरात जिवनावतश्यक वस्तुंची दुकाने सकाळी १० ते संध्याकाळी ७-३० वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश आहे.
सदर आदेशात पुढील आस्थापना सुरु ठेवता येतील किराणा दुकान, दूध डेअरी,भाजीपाला विक्री, फळ विक्री,मटन, चिकन ,मासे विक्री कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व परवाना धारक दुकाने,औषधी विक्रेता यांचा समावेश आहे.
तर सामाजिक,मंडळाचे सामुहीक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उत्सव, धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा,सर्व आठवडे बाजार, बांधकामे हे बंद राहतील. चारचाकी वाहना करीता चालक व मागील सीट वर एक व्यक्ती, दुचाकी वाहनावर फक्त चालक यांनाच परवानगी राहील. सर्व प्रकारचे टॅक्सी, ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा यांना कोणत्याही प्रकारची वाहतूकीची परवानगी राहणार नाही. सर्व हॉटेल्स, लॉजेस,रेस्टॉरंट,वाईन व बिअर बार, चित्रपट गृहे,मॉल,गॅरेज, इत्यादि पूर्णपणे बंद राहतील.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधवाना खडका रोड येथील नगरपरिषद शाळा क्रमांक ३८ समोरील मोकळ्या जागेत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात फक्त फळ विक्रेत्यांनी त्यांची दुकाने लावावी. मात्र एकाही विक्रेत्याने तोंडावर मास्क व हातात हॅंडग्लोजचा वापर करणे तसेच सोशल डीस्टनसिंगचा तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे व राहील.
कामाशिवाय नागरीकांनी घराबाहेर पडू नये. अनावश्यक बाहेर फिरतांना आढळून आल्यास संबंधितावर दंडात्मक तसेच कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.



