अमळनेर –
कुख्यात सराईत गुन्हेगार राकेश चव्हाण याचा येथील ख्वाजा नगर भागात जमावाने केलेल्या मारहाणीत लाकडी दांडका लागून खून झाल्याची घटना शुक्रवार १० एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आरोपी दोन दिवसांपूर्वीच लातूर जेलमधून जामिनावर सुटल्याची माहिती असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.
काही दिवसांपूर्वी आरोपी राकेशन चव्हाण याने अमळनेर लोहमार्ग पोलिस चौकीवर हल्ला करून वाहन व चौकीचे नुकसान केले होते शिवाय भुसावळ येथे गावठी बंदुकीसह पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी त्याला भुसावळ येथून ताब्यात घेऊन अटक केली होती. सराईत गुन्हेगार राकेश वसंत चव्हाण याच्यावर अमळनेर पोलिस ठाण्यासह भुसावळ, नंदुरबार पोलिस ठाण्यासह अन्य पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. आरोपी दोन दिवसांपूर्वीच जामिनावर सुटल्यानंतर त्याने एका भागात गेल्यानंतर त्याच्यावर दगडफेक केल्याने त्याच्यावर जमावाने हल्ला केल्याने त्याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.



