भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ शहर व परिसरात दरवर्षी हनुमान जयंती अत्यंत धूमधडाक्यात साजरी होत असते सर्व भक्त हनुमान जयंतीची आतुरतेने वाट पहात असतात .यंदा मात्र या हनुमान जयंतीच्या उत्साहावर कोरोनाचे सावट आल्याने या सणउत्सवांच्या आनंदावर विरजन पडले आहे .
आज चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती निमित्त शहरातील बडा हनुमान मंदिर, लहान मारोती मंदिर, विट्ठल मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, काळा हनुमान मंदिर , यासह विविध भागातील श्री मारोती मंदिरांमध्ये भजन , कीर्तन, जन्मोत्सव सोहळा , भंडारा , पालखी आदीं धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल बघावयास मिळते .यंदा मात्र कोरोनाचे पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून गर्दी टाळण्याकरिता कोणतेही सामाजिक, धार्मिक, कार्य , सण उत्सव होणार नाही असा आदेश असल्याने भाविकांनी मंदिरात न जाता घरोघरी हनुमान पूजन केले यावेळी ‘लॉक-डाऊन ‘ च्या विळख्यात अडकलेल्यां सर्व मंदिरात अत्यंत साधेपणाने पहाटे ६ वाजता पुजारी व महंतांचे हस्ते पूजा अर्चना करण्यात आली ,
तर भाविकांनी मंदिरात न जाता घरोघरी हनुमान पूजन केले .
मंदिरात व मंदिराबाहेरील परिसरात अजिबात गर्दी नव्हती यामुळे सर्वत्र नीरव शांतता पसरलेली दिसून आली .
यंदा संकटमोचन श्रीरामभक्त हनुमंताला , हे हनुमंता , कोरोनाच्या या संकटातून आम्हा सर्वांची सुटका कर अशी प्रार्थना करून मारोतीरायाकडे भाविकांनी साकडे घालून नवस केले .



