भुसावळ (प्रतिनिधी )-
जुना सातारा परिसरातील कोळीवाडा येथील वेदांत अनिल मालखेडे या तीन वर्षीय बालकास कुत्र्या चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.
वेदांत हा २१ फेब्रुवारी रोजी घराच्या अंगणात खेळत असताना मोकाट कुत्र्याने त्याच्या चेहऱ्याला व शरीराच्या इतर भागाला चावा घेतला होता. त्यानंतर त्याला तत्काळ भुसावळ येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथील उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यानंतर सुमारे ८ दिवस घरीच असताना
७ मार्च रोजी त्याची तब्येत अजून खालावल्याने वेदांतला साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले तिथे वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी केली असता त्याना मृत्यू झाल्याचे सांगितले. जिल्हा रुग्णालयातून पूर्ण उपचार न करताच त्यास घरी पाठविले यामुळेच या चिमुरड्याचा बळी गेला असल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.
अनिल मालखेडे हे एका खाजगी कापड दुकानात कामास असून त्यांची पत्नी मोलमजुरीचे काम करते. हलाखीच्या परिस्थितीमुळे वेदांतवर योग्य उपचार होऊ शकले नाही. तो एकलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आजी- आजोबा, आई-वडिल व एक बारा वर्षाची बहीण असा परिवार आहे. वेदांतच्या मृत्यू झाल्याने मालखेडे कुटुंबाचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.वेदांतच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली
याभागात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही नगर पालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळेच हा बळी गेला असावा असे
परिसरातील नागरिकांचे म्हणणे होते .



