भुसावळ (भुसावळ )-
यावल रस्त्यावरील स्मशानभूमीत मृतदेह घेवून येणार्या वैकुंठवाहिनी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन समोरून येणार्या अॅपे रीक्षासह दुचाकीवर धडकून झालेल्या अपघातात सुमारे नऊ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्मशानभूमीजवळील उतारावर हा अपघात घडला. या प्रकरणी मात्र शहर पोलिसात नोंद नसल्याचे सांगण्यात आले. यावल रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी शहरातून शव घेवून निघालेली शववाहिनी (एम.एच.15 ए.जी.1421) ही स्मशानभूमीजवळील उतारावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन बर्हाणपूरकरडे जळगावकडे जाणार्या अॅपे (एम.एच.19 सी.डब्ल्यू.3766) वर धडकल्याने ही रीक्षा बाजूच्या दरीत कोसळून रीक्षातील पाच प्रवासी जखमी झाले तर त्याचवेळी सावद्याकडून शहरात दुचाकी (एम.एच.19 सी.टी.6300) स्वारासदेखील वैकुंठवाहिनीची धडक बसल्याने प्रशांत सापकर यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन्ही मुले जखमी झाले. जखमींवर तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताला कारणीभूत वैकुंठवाहिनी असल्याने सामोपचाराने वादावर पडदा टाकण्यात आला तर संबंधिताना भरपाई देण्यात आल्याने तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.



