जीवनात त्रिसूत्रांचा वापर करा – डॉ.दीपक म्हैसेकर ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनापासून आपल्यासह कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्री सूत्रांचा वापर करणे आवश्यक आहे. ते तीन सूत्र म्हणजे मास्कचा वापर, सतत हात स्वच्छ धुणे तसेच शारीरीक अंतर पाळणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर यांनी येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव व श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचे उद्घाटन व उद्बोधन विद्यापीठस्तरीय कार्यशाळा झाली. याप्रसंगी म्हैसेकर यांनी मार्गदर्शन केले व शासकीय स्तरावरून राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती दिली.
कोरोना काळात रुग्णांचा सकारात्मक विचार आजार नियंत्रीत करण्यासाठी खूप आवश्यक असल्याचे मत औरंगाबाद येथील कोव्हीड तज्ञ डॉ. कौस्तुभ सोडाणी यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे समन्वयक डॉ.अनिल बारी यांनी या मोहिमेच्या संदर्भात माहिती दिली. संचालक डॉ. पंकज नन्नवरे यांनी आज पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची व सहभागी स्वयंसेवकांची माहिती संख्यात्मक व गुणात्मक स्वरुपात सादर केली. रासेयो कक्षाचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ.अतुल साळुंखे यांनी कोरोनासंदर्भात मार्गदर्शन केले.
पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे युवा अधिकारी अजय शिंदे यांनी शासकीय तसेच युवा पिढीने केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डी.कार्तिगेन उपस्थित होते. श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष पद्मा मोतीलाल कोटेचा व संजय सुराणा यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत 874 व्यक्ती सहभागी झाल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधव कदम तर आभार कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. डॉ. शुभांगी राठी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारीचे समन्वयक डॉ.अनिल बारी, डॉ.प्रशांत कसबे तसेच महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.सी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.धनवीज, डॉ.एस.के.अग्रवाल, डॉ.मीना चौधरी व भुसावळ विभागीय प्रमुख डॉ.अनिल सावळे यांचे सहकार्य लाभले. तसेच तांत्रिक बाबींसाठी विशेष सहकार्य डॉ गिरीश कोळी यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *