भुसावळ (प्रतिनिधी )-
अप गीतांजली एक्स्प्रेसमधून चोरट्याने मोबाईल लांबवल्याची घटना १८ फेब्रुवारी २०२० रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपी अशोक सदाशीव कोळी (२५, महात्मा फुले नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली.
आरोपीच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तक्रारदार हेमंत सुभाष आखाडे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर चाळ, हनुमान मंदिराजवळ, उल्हासनगर, ठाणे) हे १८ फेब्रुवारी रोजी अप १२८६० गीतांजलीच्या कोच १२ व बर्थ क्रमांक ७३ वरून भुसावळ-मुंबई प्रवास करीत असताना आरोपीने खिडकीतून हात घालून आखाडे यांचा मोबाईल लांबवला होता. पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास जाधव, एएसआय मधुकर न्हावकर, नाईक जयकुमार कोळी, कॉन्स्टेबल स्नेहा अडकिणे यांनी आरोपीला अटक केली. आरोपीला १५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.



