भुसावळ (प्रतिनिधी )-
दुरांतो एक्स्प्रेसने प्रवास करणार्या मुंबईतील रेल्वे प्रवाशाचा भुसावळ स्थानक येण्यापूर्वी चोरट्यांनी मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आकाश उर्फ कान्हा किशोर बडगुजर (भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुरूषोत्तम कोठीरामजी निंबुलकर (मुंबई) हे दुरांतोने मुंबई ते नागपूर प्रवास करीत असताना त्यांचा भुसावळ येण्यापूर्वी चोरट्याने १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर ती भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आली हेाती. पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल केरूरकर, एएसआय मधुकर न्हावकर, नाईक जयकुमार कोळी आदींनी आरोपींच्या ११ ऑगस्ट रोजी मुसक्या आवळल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास उपनिरीक्षक अनिल केरूरकर करीत आहेत



