१६ नोव्हेंबरपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा केदारनाथ सानप यांचा निर्णय भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ येथील गट क्रमांक १०० मधील मिळकत तसेच मॅसॉनिक लॉजच्या इतर मिळकतींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. गट क्रमांक १०० मधील मिळकत तसेच इतर मिळकतींसंदर्भात कथित कागदपत्रांच्या आधारे होत असलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे, अशी तक्रार केदारनाथ सानप यांनी संबंधित विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी चौकशी केली होती. त्यानंतर तहसीलदार, भुसावळ यांनी संबंधित मिळकतींचे अभिलेख तपासून शर्तभंग झाल्याचे आढळल्यास पुढील कार्यवाही करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत वादग्रस्त मिळकत व मॅसॉनिक लॉजच्या इतर मिळकतींचे व्यवहार होऊ नयेत, यासाठी संबंधित मिळकती प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित आदेशांची भुसावळ तहसीलदारांकडून अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप केदारनाथ सानप यांनी केला आहे. या प्रकरणात आदेशांची अंमलबजावणी व्हावी आणि संबंधित मिळकतींच्या व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात यावा, या मागणीसाठी त्यांनी १६ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन सादर केले असून, त्याच्या प्रती माहितीसाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.


