राष्ट्रीय एकता दिनानिमित्त माय भारत व आर्या फाउंडेशनतर्फे मार्गदर्शन शिबिर उत्साहात ! सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि युवक सक्षमीकरणाचा संदेश; मान्यवरांचे मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी) : माय भारत व आर्या फाउंडेशन, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कौशल्य विकास महाविद्यालयात पार पडलेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. आर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. वंदना वाघचौरे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड व जनसंपर्क अधिकारी ॲड. अंजुम खान आणि महाविद्यालयाचे लेक्चरर परवेझ खान यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे, माय भारत समन्वयक रितेश भारंबे, मानस झोपे, पवन कोळी, हूमेर पटेल, निर्मला श्रमसाफल्य फाउंडेशनचे ॲड. जितेंद्र मेश्राम, संत शिरोमणी फाउंडेशनचे राजू लोडते, महाजन, निगम तसेच रेल्वे स्कूलच्या शिक्षिका निरंजना तायडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सरदार पटेल यांच्या योगदानातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचा आणि देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेण्यात आला. स्वातंत्र्यानंतर देशातील विविध संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणण्यात त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे, अढळ इच्छाशक्तीमुळे आणि दूरदृष्टीमुळे त्यांना ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाते, असे सांगण्यात आले.

देशप्रेम, एकजूट, शिस्त, धैर्य आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आत्मसात करावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

माय भारत पोर्टलच्या माध्यमातून युवकांसाठी विविध संधी

माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाची माहिती दिली. तसेच माय भारत पोर्टलची सविस्तर माहिती देऊन युवकांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, उपलब्ध संधी आणि सामाजिक कार्यातील सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करून विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

ॲड. अंजुम खान यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

आर्या फाउंडेशनच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड व जनसंपर्क अधिकारी ॲड. अंजुम खान यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, एकता, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची भावना जोपासावी. सकारात्मक विचारांच्या माध्यमातून स्वतःमध्ये बदल घडवून आणत यशस्वी व्यक्तिमत्त्व निर्माण करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

मान्यवरांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व

रेल्वे स्कूलच्या शिक्षिका निरंजना तायडे यांनी शिक्षणाचे महत्त्व, व्यक्तिमत्त्व विकास, चांगले संस्कार आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुणांविषयी मार्गदर्शन केले.

निर्मला श्रमसाफल्य फाउंडेशनचे ॲड. जितेंद्र मेश्राम आणि संत शिरोमणी फाउंडेशनचे राजू लोडते यांनीही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिष्ठेचा आणि एकतेच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात जोपासावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे त्यांनी सांगितले.

आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता

या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रनिर्मितीप्रती जबाबदारीची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवकांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा आदर्श घेऊन देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अध्ययन पॅरामेडिकल कौशल्य विकास महाविद्यालयाच्या लेक्चरर मनीषा सुनील बाविस्कर यांनी केले. शेवटी आर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. वंदना वाघचौरे यांनी उपस्थित मान्यवर, अतिथी, आयोजक आणि सहभागींचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात या मार्गदर्शन शिबिराची सांगता झाली.