शिवपूजन व शस्त्रपूजनाने सोहळ्याचा शुभारंभ; दुष्काळजन्य परिस्थितीचे भान ठेवत फटाक्यांची मर्यादित आतषबाजी भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील टी. व्ही. ग्राउंडवर विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त जय मातृभूमी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संचलित जय मातृभूमी मंडळातर्फे भव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन व शस्त्रपूजनाने शुभारंभ कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि त्यांच्या पत्नी रजनी सावकारे उपस्थित होते. तसेच भुसावळच्या नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, माजी आमदार दिलीप भोळे, प्रसिद्ध उद्योगपती मनोज बियाणी व त्यांच्या पत्नी संगीता बियाणी, नगरपरिषद गटनेते बबलू बरहाटे, माजी नगरसेवक प्रमोद नेमाडे यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि मान्यवरांची उपस्थिती होती. दुष्काळाचे भान ठेवत फटाक्यांची आतषबाजी मर्यादित यंदा परिसरातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक भान जपत फटाक्यांची आतषबाजी मर्यादित स्वरूपात करण्यात आली. लहान मुलांसाठी फटाक्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. उत्सवाचा आनंद साजरा करताना शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवण्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आला. यावेळी नगरसेवक किरण कोलते यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधले. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. रामायणातील प्रसंगांतून सत्य आणि धर्माचा संदेश केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी उपस्थितांना संबोधित करताना रामायणातील प्रभू श्रीराम आणि रावण यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचा उल्लेख केला. असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय हा विजयादशमीचा मुख्य संदेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपस्थित भुसावळकरांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. रावण, कुंभकर्ण आणि इंद्रजितचे दहन कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जयघोषाच्या वातावरणात रावण दहन सोहळा पार पडला. यावेळी कुंभकर्णाचे दहन भुसावळच्या नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्या हस्ते, इंद्रजितचे दहन प्रसिद्ध उद्योगपती मनोज बियाणी यांच्या हस्ते, तर रावणाचे दहन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. रावण दहन पाहण्यासाठी टी. व्ही. ग्राउंडवर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या सहकार्यामुळे हा सोहळा शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला.




