भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विजयादशमीनिमित्त सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रामायण महाकाव्यावर आधारित मनमोहक व प्रेरणादायी नाटिकेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय होतो, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी साकारल्या रामायणातील विविध भूमिका या नाटिकेत इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी रामायणातील विविध पौराणिक पात्रांच्या भूमिका साकारल्या. विद्यार्थ्यांचा प्रभावी अभिनय, उत्तम संवादफेक आणि सादरीकरणातील उत्साह यामुळे नाटिका विशेष आकर्षण ठरली. रामायणातील प्रसंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, आदर्श विचार आणि नैतिक मूल्यांचे दर्शन घडविले. प्राचार्य नीना कटलर यांनी सांगितले रामायणाचे महत्त्व कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्य नीना कटलर, उपप्राचार्य श्रद्धाली घुले आणि मनप्रीत कौर यांची प्रमुख उपस्थिती होती. या विशेष नाटिकेचे आयोजन शिक्षिका प्रतिभा काकडे आणि जयश्री मोरेस्कर यांनी यशस्वीरीत्या केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य नीना कटलर यांनी रामायणाचे महत्त्व विशद केले. प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन, त्यांची मर्यादा, सत्यनिष्ठा आणि जीवनमूल्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. सत्य, धर्म आणि मोठ्यांचा आदर या मूल्यांचे पालन करून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले. उत्साहात रावणदहन कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी शाळेच्या परिसरात पारंपरिक पद्धतीने रावणदहन करण्यात आले. नाटिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष केला आणि परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. विजयादशमीच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाईट प्रवृत्तींचा त्याग करून सत्य, सदाचार आणि चांगुलपणाचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी आदर निर्माण होण्यासोबतच त्यांच्या कलागुणांनाही वाव मिळतो. फोटो कॅप्शन : भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विजयादशमीनिमित्त रामायण नाटिका सादर करताना विद्यार्थी-विद्यार्थिनी.



