भुसावळ (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा प्राधिकरण, भुसावळ यांच्या दिनदर्शिकेनुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी कंडारी येथील गौतम नगर परिसरात विविध कायदे व सामाजिक विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकारमित्र (PLV) सौ. संगीता भामरे यांनी उपस्थित महिला व बालकांना विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गौतम नगर परिसरातील महिलांनी सौ. संगीता भामरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर जनजागृती कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO कायदा), २०१२ याबाबत माहिती देण्यात आली. बालकांचे लैंगिक शोषण झाल्यास कायदेशीर कारवाई कशी केली जाते, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणत्या प्रकारची कारवाई व शिक्षेची तरतूद आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या विविध कायदेशीर तरतुदी, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये उपलब्ध असलेली कायदेशीर मदत आणि NALSA (राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण) मार्फत मिळणाऱ्या विधी सहाय्याची माहिती देण्यात आली. महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला घाबरून न जाता उपलब्ध कायदेशीर मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच एचआयव्ही व शारीरिक संपर्कातून प्रसारित होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी, गैरसमज टाळणे आणि आरोग्यविषयक योग्य माहिती घेण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. Drug Free India अभियानाच्या अनुषंगाने व्यसनमुक्तीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कमी वयातील मुले व्यसनांच्या आहारी जाऊ नयेत यासाठी पालकांनी व समाजाने संवेदनशीलपणे पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. व्यसनाधीन व्यक्तींना केवळ शिक्षा करण्यापेक्षा प्रतिबंध, समुपदेशन व पुनर्वसनाच्या माध्यमातून मदत करण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बालविवाह मुक्त भारत या विषयावरही जनजागृती करण्यात आली. अल्पवयात विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून मुलींनी शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहणे महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास श्री. सुरेशभाऊ सोनवणे, सौ. मालूताई नरवाडे, सौ. सुलोचनाताई साबळे यांच्यासह शिला बविस्कर, रंजनी गायकवाड, अनिता सोनवणे, पूजा सोनवणे, योगिता शिंगारे, सुजाता निकम, मीनाक्षी तायडे, मनीषा सोनवणे, वैशाली उबाळे, ऊषा सोनवणे, राणी मुखर्जी, खुशी उबाळे तसेच नामण्य सोनवणे, निरंजन उबाळे, पूर्वा सोनवणे आदी महिला व बालकांची उपस्थिती होती.


