लाच मागितल्याच्या आरोपावरून पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेश; चौकशी दरम्यान २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप ;

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश एकनाथ चौधरी यांच्यावर चौकशीदरम्यान तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ तसेच अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महेश चौधरी यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश ३० सप्टेंबर रोजी दिले आहेत.
भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १३९/२०२६ च्या चौकशीदरम्यान तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप महेश चौधरी यांच्यावर करण्यात आला होता. या संदर्भातील तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ३० सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महेश एकनाथ चौधरी हे भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्या कथित वर्तनामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम तसेच महाराष्ट्र पोलिस (शिक्षा व अपील) नियमांतील तरतुदींनुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या कालावधीत महेश चौधरी यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, तसेच जळगाव पोलिस मुख्यालयात नियमित हजेरी द्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, या कालावधीत कोणतीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नसल्याचेही आदेशात नमूद आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पुढील विभागीय चौकशी तसेच कायद्यानुसार होणारी अन्य कारवाई स्वतंत्रपणे करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लाच मागितल्याचा आरोप हा प्रकरणाच्या पुढील तपास व न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन आहे.