भुसावळ (प्रतिनिधी/उज्वला बागुल) : भुसावळ शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरातील न्यू चैतन्य गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत भाविक व नागरिकांमध्ये दारू, तंबाखू, गुटखा तसेच अन्य अमली पदार्थांच्या व्यसनांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी मंडळाच्या वतीने विशेष पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध प्रकारच्या व्यसनांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, कुटुंबावर तसेच समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देण्यात आली आहे. व्यसनांच्या विळख्यात अडकण्यामागील कारणे, व्यसनांचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारी सूचक चित्रे आणि मनोवेधक घोषवाक्यांचा पोस्टर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे प्रदर्शन विठ्ठल मंदिर वॉर्ड हा शहरातील मध्यवर्ती भाग असल्याने या ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनाकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांसह गणेशभक्तांचे लक्ष वेधले जात आहे. गणेशदर्शनासाठी येणारे भाविक प्रदर्शन पाहून व्यसनमुक्तीचा संदेश जाणून घेत आहेत. विशेषतः तरुणाईने व्यसनांपासून दूर राहावे, तसेच कुटुंब आणि समाज निरोगी ठेवण्यासाठी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा, असा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याकडून कौतुक पोस्टर प्रदर्शनाला भेट देताना बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. व्यसनमुक्ती हा समाजासमोरील गंभीर आणि ज्वलंत प्रश्न असून, अशा प्रकारच्या जनजागृतीपर उपक्रमातून नागरिकांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव निर्माण होण्यास मदत होते. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा हा उपक्रम प्रभावी असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद न्यू चैतन्य गणेश मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक वातावरण निर्मिती न करता व्यसनमुक्तीचा सामाजिक संदेश देण्यासाठी राबविलेल्या या उपक्रमाचे गणेशभक्त व नागरिकांकडून मनापासून कौतुक होत आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून, व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. उज्वला बागुल यांच्या प्रयत्नातून उपक्रमाला आकार या पोस्टर प्रदर्शनाच्या आयोजनाची संकल्पना विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरातील न्यू चैतन्य गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील पत्रकार उज्वला बागुल यांच्या प्रयत्नातून पुढे आली. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा संघटक डॉ. दयाघन एस. राणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या व्यसनमुक्तीविषयक पोस्टर्सच्या माध्यमातून हा उपक्रम प्रत्यक्षात साकारला. मंडळाच्या सदस्यांचे परिश्रम व्यसनमुक्ती जनजागृतीच्या या उपक्रमासाठी न्यू चैतन्य गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. गणेशोत्सवाच्या काळात भक्तीबरोबरच समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे ‘उत्सवातून जनजागृती’ या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.


