लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप; संशयित आरोपी तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा


भुसावळ,(प्रतिनिधी )-दि. ६ : शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात एका तरुणासह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आदित्य ब्रजेश वत्स याच्याशी ओळख झाली होती. त्याने लग्नाचे आश्वासन देत ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांचा विवाह होईल, असे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, मोटारसायकल खरेदीसाठी ३० जून २०२६ रोजी फिर्यादी व तिच्या आईने ऑनलाइन पद्धतीने सुमारे १ लाख १० हजार रुपये दिल्याचाही आरोप आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी लग्नाबाबत विचारणा केली असता आदित्य वत्स याने विवाहास नकार दिला. तसेच फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी संशयीत आरोपी आदित्य ब्रजेश वत्स, त्याचे वडील ब्रजेश कुमार सिंह आणि आई सीमा ब्रजेशकुमार सिंह (रा. मेघ मल्हार सोसायटी, वरणगाव रोड, भुसावळ) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात ५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.