स्वसंरक्षण प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना आत्मविश्वासाचा मंत्र : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा उपक्रम; एन. के. नारखेडे हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे :

भुसावळ(प्रतिनिधी )- दि. ३ ऑगस्ट : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या वतीने “स्वसंरक्षण प्रशिक्षण – सुरक्षित उद्यासाठी आजच एक पाऊल” या उपक्रमांतर्गत शांतिनगर येथील एन. के. नारखेडे हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणात समुपदेशक आरती चौधरी यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची दक्षता, सुरक्षिततेसाठी आवश्यक जागरूकता तसेच विविध स्वसंरक्षण तंत्रांचे सविस्तर मार्गदर्शन केले.

अचानक हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे, पकडीतून सुटका करण्याच्या सोप्या पद्धती, तसेच दैनंदिन जीवनात सतर्क राहण्यासाठी आवश्यक सवयी यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थिनींनी कोणत्याही संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता आत्मविश्वासाने व शांतपणे परिस्थिती हाताळावी, असे आवाहनही आरती चौधरी यांनी केले.

तसेच आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी संपर्क साधण्याचे मार्ग, हेल्पलाइन क्रमांकांचा योग्य वापर आणि महिलांचे कायदेशीर अधिकार याबाबतही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध स्वसंरक्षण तंत्रे आत्मसात केली.

आरती चौधरी यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि सजगतेची भावना अधिक दृढ झाली. स्वसंरक्षणाचे ज्ञान हे केवळ संकटाच्या वेळीच नव्हे, तर दैनंदिन जीवनात सुरक्षित व सतर्क राहण्यासाठीही महत्त्वाचे असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा योगिता वायकोळे, सचिव कविता पाचपांडे, सुनीता पाचपांडे, स्मिता चौधरी, मोना भंगाळे, विनिता नेवे, आरती पाटील व कविता हिरोडकर यांची उपस्थिती होती.

शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, शिक्षिका शबनम मॅडम तसेच इतर शिक्षकवृंद व शाळा प्रशासन यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अशा उपयुक्त प्रशिक्षणांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.