भुसावळ येथे मुख्याध्यापकांसाठी तंबाखूमुक्त शाळा कार्यशाळा संपन्न ; १५ ऑगस्टपर्यंत शंभर टक्के शाळांनी तंबाखूमुक्त निकष पूर्ण करावेत – गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे

भुसावळ, दि. ३ ऑगस्ट (प्रतिनिधी) : सलाम मुंबई फाउंडेशन आणि शिक्षण विभाग, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी तंबाखूमुक्त शाळा कार्यशाळा सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी पु. ग. बऱ्हाटे माध्यमिक विद्यालय, भुसावळ येथे उत्साहात पार पडली. कार्यशाळेत तंबाखूमुक्त शाळा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन तसेच शाळांच्या गुणवत्तावाढीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक गणेश कातकाळे यांनी तंबाखूच्या व्यसनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, तंबाखूमुक्त शाळेचे महत्त्व तसेच शाळेला तंबाखूमुक्त घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या नऊ निकषांचे पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे सविस्तर विवेचन केले. आवश्यक दस्तऐवजीकरण, जनजागृती उपक्रम, सूचना फलक, पालकांचा सहभाग, शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका आणि पडताळणी प्रक्रियेबाबत त्यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी तालुक्यातील सर्व शाळांनी १५ ऑगस्टपूर्वी तंबाखूमुक्त शाळेचे सर्व निकष शंभर टक्के पूर्ण करावेत, असे आवाहन केले. याशिवाय शालेय पोषण आहार योजना, शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सक्षमीकरण, VSK हजेरी नियमित भरणे, खान अकॅडमीचा अध्यापनात वापर, बालचित्रकला स्पर्धेचे नियोजन आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्तापूर्ण तयारीबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा व नियोजन स्पष्ट केले. विस्तार अधिकारी बी. डी. धाडी यांनी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तपासणी प्रक्रिया, स्वच्छता, आवश्यक नोंदी आणि गुणवत्तेच्या निकषांबाबत माहिती दिली.
केंद्रप्रमुख सुनील मोरे यांनी प्रत्येक शाळेत इको क्लब स्थापन करून "एक पेड माँ के नाम" उपक्रमांतर्गत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे आवाहन केले. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या कार्यशाळेस गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, विस्तार अधिकारी बी. डी. धाडी, तुषार प्रधान, सर्व केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील मोरे, मोहसीन काझी, उषा देसले, शरद पवार, किशोर चौधरी आणि राजेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच स्व. सै. कृ. पा. पाटील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी चौधरी, पु. ग. बऱ्हाटे शाळेच्या उपमुख्याध्यापिका जयश्री चौधरी, विषयतज्ज्ञ नविद खाटीक आणि विशेष शिक्षक विलास सूर्यवंशी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप परखड यांनी प्रभावीपणे केले. कार्यशाळेमुळे तंबाखूमुक्त शाळा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, शाळांमधील गुणवत्तावाढ आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या यशस्वी नियोजनासाठी मुख्याध्यापकांना उपयुक्त दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.