भुसावळात गोवंशाची अमानुष वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल , नाहाटा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ प्रतिनिधी | शुक्रवार, ३१ जुलै २०२६ : भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर गोवंशीय जनावरांची अत्यंत दाटीवाटीने व अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, ३० जुलै रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजेच्या दरम्यान नाहाटा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर टाटा कंपनीच्या छोटा हत्ती वाहनातून (क्र. एमएच-०४ एचवाय-३१८८) गोवंशीय जनावरांची वाहतूक केली जात होती.

या वाहनामध्ये तीन गोवंशीय जनावरे आणि दोन लहान वासरे अत्यंत दाटीवाटीने भरून त्यांची अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात शेख अनिस शेख हनीफ (वय ३०, रा. ख्वाजानगर, सावदा, ता. रावेर) आणि साहील खान कलीम खान (वय २२, रा. ख्वाजानगर, सावदा) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.