निंबादेवी, वड्री, मोर, हरिपुरा धरणांसह शेळगाव बॅरेज व वाघझिरा तलाव परिसरात जाण्यास सक्त मनाई : मान्सून काळात दुर्घटना टाळण्यासाठी यावल तहसीलदारांचे आदेश; उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा

यावल | प्रतिनिधी | दि. ३१ : मान्सून काळात अतिवृष्टीमुळे धरणे, तलाव, नदीपात्रे व पाटांमध्ये अचानक पाण्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावल तालुक्यातील निंबादेवी, वड्री, मोर, हरिपुरा आदी धरणांसह शेळगाव बॅरेज, वाघझिरा तलाव व इतर धोकादायक जलपरिसरात जाण्यास पुढील आदेश होईपर्यंत सक्त मनाई करण्यात आली आहे. याबाबत यावल तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मोहनमाला नाझीरकर यांनी आदेश जारी केले आहेत.

यावल तालुक्यात १ जून २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ हा मान्सून कालावधी असून, या काळात अतिवृष्टीमुळे लहान-मोठे तलाव, धरणे व पाटांमध्ये अचानक पाणी सोडले जाऊ शकते. पावसानंतर विविध धरणे, नद्या, तलाव व पाटांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते.

संभाव्य मनुष्यहानी व प्राणिहानी टाळण्यासाठी निंबादेवी धरण, वाघझिरा तलाव, वड्री धरण, मोर धरण, हरिपुरा धरण, यावल येथील पाटचारी, यावल येथील तलाव तसेच शेळगाव बॅरेज परिसरात नागरिकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

सदर प्रतिबंधित ठिकाणी नागरिक आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.