दीपनगरात एमएसएफची धडक कारवाई; २० किलो तांब्याची तार चोरीचा डाव उधळला : पिंप्रीसेकम येथील दोन कामगार जाळ्यात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी)शुक्रवार, ३१ जुलै २०२६  : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅट प्रकल्पातून तांब्याची तार चोरी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला. या प्रकरणात सुमारे २० किलो वजनाची जुनी तांब्याची तार जप्त करण्यात आली असून, अवघ्या तीन दिवसांत तपासाची चक्रे फिरवत दोन संशयित कामगारांना ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय विजय पाटील आणि शिवम बाळू सोनवणे (दोघे रा. पिंप्रीसेकम, ता. भुसावळ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, ते प्रकल्पात कामगार असल्याची माहिती मिळाली आहे.

२७ जुलै रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास प्रकल्पातील मोटारसायकल पार्किंग परिसरात काही संशयित व्यक्ती चोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती सुरक्षा रक्षक समाधान कोळी यांनी सुरक्षा पर्यवेक्षक संतोष खैरनार यांना दिली. माहिती मिळताच संतोष खैरनार, योगेश्वर बच्छाव आणि राहुल महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.

सुरक्षा पथक येत असल्याचे लक्षात येताच दोन संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला; मात्र अंधाराचा फायदा घेत दोघे पसार झाले.

संशयास्पद बॅगेत सापडली तांब्याची तार

घटनास्थळाची कसून पाहणी करत असताना सुरक्षा पथकाला एक संशयास्पद बॅग आढळून आली. बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे २० किलो वजनाची जुनी तांब्याची तार सापडली. जप्त करण्यात आलेल्या तांब्याच्या तारांची अंदाजे किंमत १४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एमएसएफच्या सुरक्षा पथकाने स्वतंत्र तपास सुरू ठेवला. सातत्यपूर्ण चौकशी आणि तपासानंतर अवघ्या तीन दिवसांत, ३० जुलै रोजी दोन्ही संशयितांचा शोध घेण्यात सुरक्षा पथकाला यश आले.

चौकशीदरम्यान दोघांनी चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोघांना मुद्देमालासह भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सुरक्षा पर्यवेक्षक संतोष नथ्थू खैरनार यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार महेश चौधरी करीत आहेत.