भुसावळ (प्रतिनिधी,) दि. ३१ जुलै : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, धरणातून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, पुढील काही तासांत हा विसर्ग ३ लाख ५० हजार ते ३ लाख ७५ हजार क्युसेक्सपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी १०.४० वाजेच्या स्थितीनुसार, हतनूर धरणाच्या एकूण ४१ पैकी ४ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून, ३२ दरवाजे प्रत्येकी दोन मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून तापी नदीपात्रात १ लाख ८५ हजार ८२८ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने विसर्गात आणखी वाढ करण्यात येऊ शकते. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरांवरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा पूर-सतर्कतेचा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग तसेच जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या वतीने देण्यात आला आहे.


