भुसावळ प्रतिनिधी : हतनूर प्रमुख प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततधार दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या स्थितीनुसार, हतनूर धरणाची पाणीपातळी २१२.१९० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणाची पूर्ण जलसाठा पातळी २१४.००० मीटर आहे.धरणाचे ४ रेडियल दरवाजे पूर्णपणे, तर ३२ दरवाजे प्रत्येकी २ मीटरने उघडण्यात आले आहेत धरणातील एकूण पाणीसाठा २८९.५० दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ७४.६१ टक्के इतका झाला आहे. तर उपयुक्त पाणीसाठा १५६.५० दशलक्ष घनमीटर, म्हणजे ६१.३७ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. सध्या धरणाचे ४ रेडियल दरवाजे पूर्णपणे, तर ३२ दरवाजे प्रत्येकी २ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून तापी नदीपात्रात ५,२६२ घनमीटर प्रति सेकंद, अर्थात तब्बल १ लाख ८५ हजार ८२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कालव्याद्वारे ५.६६ घनमीटर प्रति सेकंद, म्हणजेच २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून सध्या कोणताही विसर्ग सुरू नाही. आजपर्यंत धरण परिसरात ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंतचा एकूण पाऊस २५८ मिलिमीटर इतका झाला आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


