भुसावळ प्रतिनिधी : हतनूर धरणातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील पाण्याच्या विसर्गामुळे तापी आणि पूर्णा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत आहे. शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ ते ८ या दोन तासांच्या कालावधीत दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ नोंदविण्यात आली. बुरहानपूर येथे तापी नदीची आधार पातळी २१६.००० मीटर आहे. सकाळी ६ वाजता नदीची पाणीपातळी २२०.८०० मीटर इतकी होती. त्यानंतर अवघ्या दोन तासांत पाणीपातळीत २.६०० मीटरची वाढ होऊन सकाळी ८ वाजता ती २२३.४०० मीटरवर पोहोचली. दरम्यान, येर्डी येथे पूर्णा नदीची आधार पातळी २१४.००० मीटर आहे. सकाळी ६ वाजता पूर्णा नदीची पाणीपातळी २२३.६५० मीटर इतकी नोंदविण्यात आली होती. सकाळी ८ वाजता ती वाढून २२५.३५० मीटर झाली. म्हणजेच दोन तासांत पूर्णा नदीच्या पाणीपातळीत १.७०० मीटरची वाढ झाली आहे. तापी व पूर्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


