मुंबई एसटी प्रवासदरम्यान शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवाशांना स्मार्ट कार्ड नसले तरी वर्तमान पद्धतीने प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, राज्यभरातील एसटी डेपो आणि स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. काही ठिकाणी कार्डसाठी जास्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देत सरकारने मुदतवाढ जाहीर केली आहे. परिवहन विभागाने पात्र प्रवाशांना वाढीव मुदतीचा लाभ घेत लवकरात लवकर NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.


