कासोदा (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या फरकांडे गावातील ऐतिहासिक झुलत्या मनोऱ्यांना जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी २६ जुलै रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या ऐतिहासिक वास्तूची सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या दुरुस्ती व संवर्धन कामाचा आढावा घेतला. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत झुलत्या मनोऱ्यांच्या जतन व संवर्धनासाठी पहिल्या टप्प्यात ₹१ कोटी १७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून मनोऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली असून परिसरात रेखीव दगड बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यासाठी ₹१ कोटी १८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मनोरा परिसरात उद्यान विकसित करणे, सुशोभीकरण करणे तसेच संरक्षक भिंत (वॉल कंपाउंड) उभारण्याची कामे करण्यात येणार आहेत. यावेळी फरकांडे येथील पोलीस पाटील अमृत देशमुख, ग्रामपंचायतीचे सरपंचपुत्र गणेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद पाटील, भगवान गढरी, गजानन पाटील व प्रवीण पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील यांचा सत्कार केला. पाहणीप्रसंगी जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील, कासोदा महसूल मंडळ अधिकारी भरत पारधे, पत्रकार शालिग्राम पाटील, फरकांडे येथील महसूल अधिकारी संगीता भोसले, महसूल सेवक सौ. अनिता दीपक पाथरवट आदी मान्यवर उपस्थित होते.


