तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…’च्या जयघोषात भुसावळ नगरी सज्ज

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरे सजली; विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक आतुर

१७५ वर्षांच्या प्राचीन श्रीविठ्ठल-रुख्माई मंदिरात महाअभिषेक, महापूजा व भव्य दिंडी सोहळा

भुसावळ (उज्वला बागुल) - : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल... देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल...’ या भक्तिरसाने ओथंबलेल्या अभंगवाणीचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामस्मरणात आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा साजरा करण्यासाठी भुसावळ नगरी सज्ज झाली आहे. आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक आतुर झाले असून शहर व परिसरातील श्रीविठ्ठल मंदिरांसह विविध मंदिरांमध्ये दिंडी, भजन, हरिपाठ, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विठ्ठल मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिर परिसराचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. मंदिरांवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि भक्तिमय वातावरणामुळे शहरात जणू पंढरी अवतरल्याचा अनुभव भाविकांना येत आहे.

१७५ वर्षांची भक्तीची अखंड परंपरा

शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील श्रीविठ्ठल-रुख्माई मंदिर हे सुमारे १७५ वर्षांपूर्वीचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. सुमारे १८५१ मध्ये या मंदिराची स्थापना झाली असल्याची आख्यायिका येथील वयोवृद्ध सांगतात. द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या या मंदिराने अनेक पिढ्यांची श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरा जपली आहे.

मंदिराचे ट्रस्टी सुहास फालक व सभासद तसेच टाळकरी , विणेकरी,  यांच्यासह अनेक भाविक व वारकरी मंदिराची देखभाल करीत आहेत. मंदिरात नित्यपूजा, हरिनामस्मरण, कीर्तन व भजनाचे कार्यक्रम भक्तिभावाने सुरू असतात. मंदिराचे पुजारी श्री मंगेश पाठक यांचे अधिपत्याखाली दररोज अविरत सेवा बजावत मंत्रोच्चारात विधिवत पूजाअर्चना होत असते. आषाढी एकादशी निमित्त खास सजावट करण्यात आली असुन पहाटे सहा वाजता मंदिराचे ट्रस्टी सुहास फालक सपत्नीक श्री पांडुरंगाचा महाअभिषेक व विधीवत पूजन करण्यात येणार आहे. सकाळी साडेसहा वाजता आरती तसेच सकाळी सात ते अकरा गीता पारायण  महिला भजनी मंडळ सादर करतील तर सकाळी ११ वाजता शालिनी वाढेकर व सहकारी यांचा  गीता पठणाचा कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या या विविध धार्मिक कार्यक्रमांवर अध्यक्ष सुहास फालक व सचिव प्रशांत मुरलीधर बऱ्हाटे लक्ष ठेवून आहेत. 

दररोज काकड आरती तसेच श्रीविठ्ठल-रुख्माईची विधिवत पूजा केली जाते. विविध धार्मिक सण व उत्सवही मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. महिला भजनी मंडळाच्या पुष्पा ढाके, विजया बऱ्हाटे नलिनी बऱ्हाटे, नलिनी सरोदे, लक्ष्मीबाई फालक, तुळसाबाई फालक व नलिनी बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ, अभंग, गीता पठण व भजनाचे कार्यक्रम नित्यनियमाने आयोजित केले जातात.

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र

या प्राचीन दुमजली विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस नवीन बांधकाम करण्यात आले असून मंदिराचे सभागृह व इमारत लग्न समारंभ, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वैकुंठवासी ह.भ.प. धनजी बुवा महाराज, तोताराम महाराज, झेंडुजी महाराज व जगन्नाथ महाराज यांची अखंड सेवा व परंपरा या विठ्ठल मंदिराला लाभली आहे.

‘पुष्पक विमान’मुळे मंदिराची राज्यभर ओळख

या प्राचीन मंदिरात मार्च २०१८ मध्ये ‘पुष्पक विमान’ या मराठी चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले होते. सिनेअभिनेते मोहन जोशी व सुबोध भावे यांच्यावर मंदिर परिसरात चित्रिकरण झाले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भुसावळच्या या ऐतिहासिक श्रीविठ्ठल मंदिराची ओळख महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही पोहोचली.

२५ जुलैला महाअभिषेक व भव्य दिंडी सोहळा

आषाढी एकादशीनिमित्त २५ जुलै रोजी पहाटे श्रीविठ्ठल-रुख्माई यांच्या मूर्तीचा विधिवत महाअभिषेक व महापूजा पुजारी श्री मंगेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. यावेळी विठुरायाला रेशमी महावस्त्र परिधान करून सोन्या-चांदीचे दागदागिने व विविध आभूषणांनी साजशृंगार करण्यात येणार आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात हार, फुले, नारळ, अबीर, गुलाल, बुक्का व पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली जाणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करीत भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दिंडी काढण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायातील भाविक, शहर व परिसरातील नागरिक, महिला भजनी मंडळे तसेच आबालवृद्ध मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. ठिकठिकाणी दिंडीचे मोठ्या उत्साहात व आनंदात स्वागत करण्यात येते.

शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात येऊन शहरभ्रमणानंतर ती पुन्हा मंदिरात येईल. त्यानंतर विठुरायाची महाआरती करून या भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.

दशमीच्या दिंडीची (भ्रमणफेरी)  पूर्वापार परंपरा कायम

दर महिन्याला एकादशीच्या आदल्या दिवशी, म्हणजेच दशमीलासायंकाळी शहरात टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडीची भ्रमणफेरी काढण्याची पूर्वापार परंपरा आजही अखंड सुरू आहे. ‘ उद्या एकादशी आहे’, याची जाणीव भाविकांना करून देणारी ही भक्तिमय परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे.

भाविकांना फराळाचे वाटप

आषाढी एकादशीनिमित्त २६ जुलै रोजी दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी विविध राजकीय सामाजिक संस्थांतर्फे फराळाचे (साबुदाणा खिचडी ) वाटप करण्यात येणार आहे. भाविकांना साबुदाणा खिचडीसह फराळाचे वितरण केले जाणार आहे.

हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीविठ्ठल मंदिर ट्रस्ट व विठ्ठल मंदिर वॉर्ड तरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक परिश्रम घेत आहेत.

---

चौकट : आषाढीच्या पार्श्वभूमीवर फराळाच्या वस्तूंना मागणी

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भुसावळच्या बाजारपेठेत फराळाच्या वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे. साबुदाणा, शेंगदाणे, खजूर तसेच विविध फळफळावळ मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली आहे.

केळी, सफरचंद, आंबे, रताळे यांसह विविध फळांना मागणी वाढली असून साबुदाण्याचे वडे, केळी चिप्स, बटाटा चिप्स, राजगिरा लाडू व शेंगदाणे चिक्की यांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. उपवासाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फराळाच्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.