भुसावळात ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी.विठ्ठल नामाच्या गजरात निघाली ताप्ती पब्लीक स्कूलची दिंडी;बालवारकऱ्यांनी भुसावळकरांचे वेधले लक्ष

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील ताप्ती पब्लीक सीबीएसई इंग्लीश मिडीयम स्कुल तर्फे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राची अलौकिक परंपरा असलेल्या वारकरी दिंडी सोहळ्याचे अतिशय उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. ज्ञानबा-तुकाराम' आणि हरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. दिंडीचे पूजन आणि संतांची वेशभूषा दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांच्या हस्ते पालखी व विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून झाली. या दिंडीच्या अग्रभागी संतांच्या हुबेहूब वेशभूषेमध्ये असलेले लहान विद्यार्थी सर्वांचे मुख्य आकर्षण ठरले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि रिंगण सोहळा पारंपारिक वारकरी वेशभूषेत नटलेल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या भजनांवर आणि अभंगांवर ठेका धरला होता. विद्यार्थ्यांच्या लयबद्ध हालचाली, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठू माऊलीच्या जयघोषाने शाळेचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. नगरपरिक्रमा आणि प्रसादाचे वाटप ताप्ती पब्लिक स्कूलपासून सुरू झालेली ही दिंडी शहरातील गायत्री नगर, विकास कॉलनी आणि शिव कॉलनी या प्रमुख भागांतून मार्गस्थ झाली. या मार्गावर बालवारकऱ्यांचे नागरिकांनी कौतुक केले. त्यानंतर दिंडीचा समारोप पुन्हा शाळेत झाला. याप्रसंगी प्राचार्या नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची अलौकिक संस्कृती आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेची माहिती दिली. दिंडीच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तीत दर्शन घेतले आणि त्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 फोटो कॅप्शन - भुसावळ येथील ताप्ती पब्लीक सीबीएसई इंग्लीश मिडीयम स्कुलच्या विद्याथ्यांनी आषाढी एकादशी निमित्त काढलेली दिंडीत प्रिंसिपल निना कटलर व बालगोपाल विद्यार्थी.