जळगाव ( प्रतिनिधी ) - आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर दि.25 जुलै शनिवार रोजी पिंप्राळा येथील ऐतिहासिक आणि अत्यंत प्राचीन श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या प्रांगणात एका विशेष भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री विठ्ठल मंदिर संस्थान हे 'प्रतिपंढरपूर' म्हणून ओळखले जाते. जळगाव येथील प्रसिद्ध ‘भक्तीनाद’ भजन संध्या ग्रुपतर्फे विठू माऊलीच्या चरणी सुरांची सेवा अर्पण केली जाणार आहे.सकाळी रंगणार भक्तीगीतांची मैफिल हा सुवर्णयोग आषाढी एकादशीला सकाळी ९ ते ११ या वेळेत जुळून येणार आहे.विठ्ठल मंदिराच्या पवित्र आणि ऐतिहासिक प्रांगणात भक्तीगीतांची ही सुश्राव्य मैफिल रंगणार असून, संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघणार आहे. या मंगलमयी प्रसंगी विठ्ठल दर्शनासाठी आणि भजनाचा आनंद घेण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित राहणार आहेत.'भक्तीनाद' ग्रुपचे परिचित कलाकार आपल्या सुराने आणि सादरीकरणाने हा सोहळा अविस्मरणीय बनवणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध गायक निलेश पाटील हरहुन्नरी कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे,गायिका वृंदा पालखे,सहकलावंत प्रवीण पाटील आणि त्यांचे सहकारी सहभागी होणार आहेत. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष मोहनराव वाणी यांच्यासह मंदिराचे सर्व पदाधिकारी आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पिंप्राळा आणि परिसरातील सर्व विठ्ठल भक्तांनी या भक्तीमय सोहळ्याला उपस्थित राहून भजन संध्येचा आणि विठू माऊलीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंदिर संस्थान आणि "भक्तीनाद" भजन ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.


