भुसावळ (प्रतिनिधी दिनांक १६ जुलै ) : बहुचर्चित असलेल्या भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी तब्बल ३०१ पैकी ३०० विषयांना विरोधकांच्या अनुपस्थितीत बहुमताने मंजुरी देण्यात आली. मात्र एलईडी पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा विषय क्रमांक ३७ एकमताने नामंजूर करण्यात आला. शहर विकासाशी संबंधित विविध प्रस्तावांना सभागृहाने ग्रीन सिग्नल दिला, तर शहरातील मूलभूत नागरी समस्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला गटनेते युवराज लोणारी, प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, विरोधी गट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांनी सभेच्या एक दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत सभा बेकायदेशीर असल्याचा दावा केला आणि सभेवर बहिष्कार टाकला. परंतु ही सभा कायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले .
मोकाट कुत्रे, कचरा आणि नालेसफाईवर जोरदार चर्चा
सभेत शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, उघड्यावर होणारी मांसविक्री, रखडलेली नालेसफाई, दिवसभर सुरू राहणारे पथदिवे, उद्यानांची दुरवस्था आणि घरपट्टी सर्वेक्षणातील त्रुटी या विषयांवर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.
नगरसेवक किरण कोलते यांनी महापुरुषांच्या नावाने असलेल्या उद्यानांची दुरवस्था अधोरेखित करत संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली. गिरीश महाजन यांनी घरपट्टी सर्वेक्षणातील त्रुटींमुळे नागरिकांना फटका बसत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर बबलू बऱ्हाटे यांनी पालिका संकुलांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून ती 'पे अँड यूज' तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव मांडला.
नालेसफाईसाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी.
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी शहरातील विविध नाल्यांमध्ये रेती व कचरा टाकणाऱ्या व्यापारी आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. नालेसफाईवर दरवर्षी सुमारे ८० लाख रुपये खर्च होत असल्याचे सांगत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
उघड्यावर मांसविक्रीवर संताप
नगरसेविका सोनल महाजन तसेच नगरसेवक गिरीश महाजन, पिंटू कोठारी आणि विशाल नाटकर यांनी उघड्यावर सुरू असलेल्या मांसविक्रीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. मांसविक्रीनंतरचा कचरा थेट नाल्यांमध्ये टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
२४ तास सुरू असलेल्या पथदिव्यांवर उपाय
शहरातील अनेक भागांत दिवसभर पथदिवे सुरू राहत असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर संबंधित ठिकाणी टायमर बसविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
सभेतील विविध प्रश्नांवर प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी संबंधित विभागांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
...... मंजूर झालेले प्रमुख ठराव.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त,शहरातील नालेसफाईची कामे
महापुरुषांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई
विविध उड्डाणपुलांना महापुरुषांची नावे
जलकुंभांची दुरुस्ती व डागडुजी
पालिका संकुलांचे नूतनीकरण व वॉटरप्रूफिंग
विविध भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण
पेव्हरब्लॉक व सिमेंट बाकांची उभारणी यासह विविध विकास कामे एकमताने मंजूर केले.
मात्र एलईडी पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा विषय क्रमांक ३७ सभागृहाने एकमताने फेटाळला; उर्वरित ३०० विषयांना बहुमताने मंजुरी देत शहर विकासाच्या कामांना ग्रीन सिग्नल देण्यात आला.