जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीनमध्ये वडा-पाव, कचोरी व इतर तेलकट खाद्यपदार्थ थेट वृत्तपत्राच्या (न्यूज पेपरच्या) कागदावर दिले जात असल्याचा आरोप करत भुसावळ येथील प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने वेळोवेळी छापील वृत्तपत्र किंवा मुद्रित कागदावर खाद्यपदार्थ देण्यास मनाई केली असून, छपाईतील शाईतील रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीनमध्ये या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शासनाच्या कार्यालयातच अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्यास सर्वसामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असेही तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीत करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या :
- संबंधित कॅन्टीनची तात्काळ तपासणी करण्यात यावी.
- वृत्तपत्र किंवा मुद्रित कागदावर खाद्यपदार्थ देण्याची प्रथा तात्काळ बंद करण्यात यावी.
- संबंधित कंत्राटदार किंवा जबाबदार व्यक्तीवर नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी.
- भविष्यात अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
- या तक्रारीवर झालेल्या कारवाईची माहिती लेखी अथवा ई-मेलद्वारे तक्रारदारास कळविण्यात यावी.
या तक्रारीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अन्नसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


