भूसावळात २० जुलैला भव्य तापी माता जन्मोत्सव; १०८ मीटर साडी चुनरी अर्पणसह महाआरतीचे आयोजन :

तापी भक्त परिवार आणि साई निर्मल फाऊंडेशनतर्फे तापी महाआरती व विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन 
भुसावळ (प्रतिनिधी)-: तापी नदीकाठच्या भूसावळ शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढ शु. सप्तमी निमित्त सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी भव्य 'तापी माता जन्मोत्सव' आणि तापी महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'सूर्यकन्या तापी भक्त परिवार, भूसावळ' आणि 'साई निर्मल फाऊंडेशन, भूसावळ' यांच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
१०८ मीटर साडी चुनरी ठरणार मुख्य आकर्षण
यावर्षीच्या जन्मोत्सव सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तापी मातेला अर्पण करण्यात येणारी १०८ मीटर लांबीची भव्य साडी चुनरी असेल. ही विशेष साडी चुनरी गुजरात मधील सुरत शहरातून खास मागवण्यात आली आहे. अत्यंत आकर्षक आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेली ही चुनरी तापी मातेला अर्पण करतानाचा सोहळा भाविकांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार आहे.
हा भव्य जन्मोत्सव सोहळा सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक ९ वाजून १६ मिनिटांनी सुरू होईल. भूसावळ येथील जुने महादेव मंदिर, तापी घाट (जिल्हा जळगाव) येथे या सोहळ्याचे आणि भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सूर्यकन्या तापी भक्त परिवार आणि साई निर्मल फाऊंडेशनच्या वतीने सर्व आदरणीय भाविक भक्तांना या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन तापी मातेची महाआरती करावी आणि दर्शनाचा लाभ घेऊन आपले जीवन कृतार्थ करावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. अधिक माहितीसाठी 9325147700 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.