भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील जलशुद्धीकरण केंद्र आणि अग्निशमन विभाग येथे कथित वीजचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)च्या पथकाने छापेमारी करत मोठी कारवाई केली. प्राथमिक तपासात सुमारे २०० किलोवॅट वीजेचा अनधिकृत वापर झाल्याचे समोर आले असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता रमण दातूनवाला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जलशुद्धीकरण केंद्र व अग्निशमन विभागाची पाहणी केली. तपासादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सर्व्हिस रोडलगत असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर परिसरातील वीज खांबावरून जलशुद्धीकरण केंद्र आणि अग्निशमन विभागापर्यंत कथितरित्या बेकायदेशीर वीजजोडणी घेण्यात आल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात सुमारे २०० किलोवॅट वीजेचा अनधिकृत वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित ठिकाणी बी.सी. बियाणी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत काम सुरू असल्याचे समजते. महावितरणने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, तपासाअंती संबंधितांवर वीज कायद्यानुसार नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या या प्रकरणामुळे भुसावळ शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.



