भुसावळ (प्रतिनिधी) : जात प्रमाणपत्र प्रकरणात शासनाने अपात्र ठरवलेल्या भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे-गौर यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवार (14 जुलै) रोजी द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. मात्र, याप्रकरणी अंतिम निर्णय न देता न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 28 जुलै ही तारीख निश्चित केली आहे. न्या. किशोर संत आणि न्या. अजित कडेठाणकर यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान नगराध्यक्ष गायत्री भंगाळे-गौर यांच्या वतीने अॅड. संजीव देशपांडे यांनी बाजू मांडली. तर याचिकाकर्ते राहुल तायडे यांच्या वतीने अॅड. महेश देशमुख आणि अॅड. वसंत भोलाणकर यांनी कामकाज पाहिले. दोन्ही बाजूंचे प्राथमिक म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रकरणातील संबंधितांना पुन्हा नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. तसेच सविस्तर सुनावणीसाठी मंगळवार, 28 जुलै ही पुढील तारीख निश्चित करण्यात आली. शहरवासीयांचे लक्ष आता 28 जुलैच्या सुनावणीकडे या प्रकरणात 14 जुलैच्या सुनावणीतच काही महत्त्वपूर्ण निर्णय अथवा निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने भुसावळकरांचे लक्ष या सुनावणीकडे लागले होते. मात्र न्यायालयाने पुढील तारीख दिल्याने आता शहरवासीयांचे लक्ष 28 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे. त्या दिवशी न्यायालयात होणाऱ्या सविस्तर सुनावणीत या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


