नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळील प्रसिद्ध भावली धरण व धबधबा परिसरात महिला पर्यटकाचा कथित विनयभंग झाल्यानंतर संतप्त तरुणांच्या टोळक्याने तिच्या कुटुंबावर हल्ला करून त्यांच्या कारची तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता संबंधित वाहनाचा तब्बल १५ ते २० किलोमीटरपर्यंत पाठलाग करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा संताप व्यक्त होत असून, नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी ९ आरोपींना अटक केली आहे. एका आरोपीचा शोध सुरू आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी नाशिकमधील एक कुटुंब सहलीसाठी इगतपुरीजवळील भावली धरण परिसरात गेले होते. जेवण करून परतत असताना दोन तरुणांनी कुटुंबातील एका महिलेला अश्लील शेरेबाजी करत शिट्ट्या मारल्या व तिचा छळ सुरू केला. महिलेने त्यांना जाब विचारल्यानंतर तिचे पती व दीर यांनीही संबंधित तरुणांना खडसावले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. टोळक्याचा हल्ला, कारची तोडफोड वाद सुरू असतानाच परिसरातील काही दुकाने व गावातून आणखी ८ ते १० जण घटनास्थळी आले. त्यांनी कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच त्यांच्या कारच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तेथून कारने नाशिककडे प्रयाण केले. १५ ते २० किलोमीटरपर्यंत पाठलाग पीडित कुटुंबाच्या आरोपानुसार, हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा सुमारे १५ ते २० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. या काळात कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही युवक कारवर हत्यारासारख्या वस्तूने हल्ला करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ९ आरोपी जेरबंद; एकाचा शोध सुरू महिलेच्या तक्रारीवरून नाशिक ग्रामीण पोलिसांनी विनयभंग, मारहाण, तोडफोड व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. व्हिडिओ फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर पर्यटनस्थळांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.


