मुंबई, लोणावळा–कर्जत विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान ६ जुलै रोजी झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. ७ जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंतच्या अद्ययावत माहितीनुसार अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द, वळविण्यात, अंशतः रद्द, शॉर्ट टर्मिनेट, शॉर्ट ओरिजिनेट तसेच पुनर्निर्धारित करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १७ गाड्या पूर्णपणे रद्द, १ गाडी अंशतः रद्द, २९ गाड्या वळविण्यात, १४ गाड्या शॉर्ट टर्मिनेट, १२ गाड्या शॉर्ट ओरिजिनेट तर १२ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पुणे–भुज एक्सप्रेस, पुणे–सोलापूर इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस, सातारा–दादर एक्सप्रेस, कोल्हापूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आदी महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, नांदेड, पनवेल, भुवनेश्वर, मिरज, राजकोट, इंदूर, हजरत निजामुद्दीन आदी मार्गावरील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या दौंड–मनमाड–इगतपुरी किंवा अन्य पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आल्या आहेत. काही गाड्या पुणे, खडकी, दौंड, कुर्डुवाडी आणि इगतपुरी स्थानकांवरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या असून, अनेक गाड्या याच स्थानकांवरून शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येत आहेत. तसेच अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत काही तासांचा बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. दरड हटविण्याचे आणि मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिस्थितीनुसार रेल्वे वाहतुकीत पुढील बदल होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


