काळखेडाच्या पिसुर्वोंचे नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन, सव्वा लाखाचे घेतले पेंटिंग : कला जगत : मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत ‘मान्सून शो’त योगदान

​जळगाव (प्रतिनिधी )- मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत ४६ व्या मान्सून आर्ट शो नुकताच पार पडला. नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जळगाव जिल्ह्यातील काळखेडा येथील चित्रकार पिसुर्वो अर्थात जितेंद्र सुरळकर यांनी एक पेंटिंग १ लाख ३० हजारांत घेतले. ते मुंबई येथील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट बीएफए शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी अनिकेत वर्माने रेखाटले होते.

​मुंबईतील याच प्रदर्शनात पिसुर्वो यांनी त्यांची आजी धृपताबाई व भागिरथाबाई यांच्या स्मरणाथ चित्रकार वैष्णवी संजय जाधव हिला २५ हजारांची प्रोत्साहन राशी देऊन गौरवले. ती छत्रपती संभाजीनगर शासकीय कला व रचना कॉलेजची विद्यार्थिनी आहे. नॅशनल गॅलरी मॉडर्न आर्टला सुरू असलेल्या प्रदर्शनात प्रदीप चंद्र आणि चित्रकार पिसुर्वो यांचाही सहभाग आहे. 'लेंस ॲड लेगसी बॉलीवूड इन फोकस' या शीर्षकाचे हे प्रदर्शन आहे. ते ३० जूनपर्यंत होते. मात्र, रसिकांचा प्रतिसाद पाहता आता त्याला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. हे प्रदर्शन निधी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. 'हे प्रदर्शन मुंबईला मिळालेल्या युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमधील 'क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म' या मान्यतेचा गौरव करते असे त्या म्हणाल्या. प्रदर्शनाचे क्युरेशन श्रुती दास यांनी केले असे सांगण्यात आले.

*मान्सून शोमध्ये कलाजागर*

जहांगीर आर्ट गॅलरीत १९७७ पासून मान्सून शो आयोजित केला जातो. त्यात महाराष्ट्रातील 'बीएफए' आणि 'एमएफए'च्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी सहभागी होतात. आपल्या कुंचल्याच्या सफाईदार फटक्यातून रेखाटलेल्या चित्रकृती ते मांडतात. त्यांना प्रोत्साहन व कलप्रवासात आर्ट मटेरियलसाठी मदत व्हावी म्हणून पिसुर्वोनी आई शकुंतला पुंडलिक कोळी यांच्या नावाने १ लाख ३० हजार रुपयांचे पेंटिंग विकत घेतले. लेखक प्रदीप चंद्र, रामदास इंगळे, सुरज कोळी उपस्थित होते. पिसुर्वो हे विद्यार्थी चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन संवाद साधत असतात.

*​चित्रातून चित्रपटसृष्टीचा प्रवास चितारला*

'लेंस ॲड लेगसी बॉलीवूड इन फोकस' या प्रदर्शनात 'पिसुर्वोंच्या नजरेतून एक प्रवास' हे चित्र आहे. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आणि त्यांच्या सहचारिणी सरस्वतीबाई फाळके यांच्या जीवनप्रवासाचे कलात्मक पुनर्कल्पने सादर करते अशी भावना प्रदर्शनाला भेट दिलेले जळगावचे अश्विन पाटील यांनी व्यक्त केली.