जामनेर-कुऱ्हा बसमध्ये ९ तोळे सोन्याचे दागिने लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

    भुसावळ  (प्रतिनिधी ) - जामनेर ते कुऱ्हा (ता. भुसावळ) दरम्यान धावणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या ७१ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या पॅन्टच्या चोर खिशातून तब्बल ९ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील रहिवासी कांतीलाल मोतीलाल चोपडा (वय ७१) हे ३ जुलै २०२६ रोजी एसटी बसने प्रवास करत होते. सकाळी सुमारे ११.२० ते ११.४५ वाजेच्या दरम्यान लोहारा ते भुसावळ या प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या पॅन्टच्या चोर खिशात एका पाऊचमध्ये ९ तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते. मात्र, बसमधील गर्दीचा आणि प्रवासातील गडबडीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने अत्यंत चलाखीने त्यांच्या खिशातील दागिन्यांचे पाऊच लंपास केले.

भुसावळ येथे उतरल्यावर दागिन्यांचे पाऊच चोरीस गेल्याचे कांतीलाल चोपडा यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.१८ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ (क) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याची नोंद करताना पोलिसांनी 'ई-साक्ष' प्रणालीचा वापर केला आहे. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर एसटी बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.