जळगाव ( प्रतिनिधी ) : शहरातील कोल्हेनगर परिसरालगत असलेल्या प्रसिद्ध श्री काशी विश्वेश्वर मंदिरात सोमवार, दि. ६ जुलै रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता "भक्तीनाद" भजन संध्या ग्रुपतर्फे भव्य भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पवित्र श्रावणी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या भक्तिमय सोहळ्यात नामवंत कलाकार आपल्या स्वरसेवेने उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब भिजविणार आहेत. या भजन संध्येत जळगावातील प्रसिद्ध गायक निलेश पाटील, ज्येष्ठ कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे, गायिका वृंदा पालखे, राखी हेडा तसेच प्रवीण पाटील हे कलाकार आपल्या सुरेल आवाजातून विविध भक्तिगीते सादर करणार आहेत. त्यांच्या सुमधुर सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे. जुने रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या मागे, माजी महापौर ललितभाऊ कोल्हे यांच्या बंगल्याजवळ (भगवान नगर परिसर) वसलेले श्री काशी विश्वेश्वर मंदिर हे जळगाव शहरातील अत्यंत स्वच्छ, शांत आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या नयनरम्य आणि प्रसन्न वातावरणामुळे शहरासह परिसरातील हजारो शिवभक्त येथे नियमित दर्शनासाठी येत असतात. या पवित्र स्थळी आयोजित करण्यात आलेली 'भक्तीनाद' भजन संध्या भाविकांसाठी एक आगळीवेगळी आध्यात्मिक पर्वणी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व आबालवृद्ध नागरिक, शिवभक्त आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन "भक्तीनाद" ग्रुपचे तुषार वाघुळदे आणि मंगला पाटील यांनी केले आहे.


