सातपूरमध्ये कोयत्यासह तरुण जेरबंद गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई

नाशिक (प्रतिनिधी) - शहरात धारदार शस्त्रे बाळगून दहशत निमाण करणा-यांविरोधात नाशिक शहर गुन्हे शाखेने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सातपूर परिसरातून एका १९ वर्षीय तरुणाला धारदार लोखंडी कोयत्यासह अटक करण्यात आली. आरोपीकडून सुमारे ५०० रुपयांचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी शहरातील प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्या आणि दहशत माजविणा-या गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२चे पथक २ जुलै रोजी परिमंडळ क्रमांक २ हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त घालत होते.
    यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर आणि पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गुप्त माहिती मिळाली की, एक तरुण हॉटेल जलसा, सातपूर परिसरात लोखंडी धारदार कोयता घेऊन
फिरत आहे. ही माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. 
   त्याच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बोरा ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर, नगर मार्गावर सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणा-या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव ललित हरीष बल्लक (वय १९), रा. फुलेनगर, पंचवटी, नाशिक असे सांगितले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता आढळून आला. पंचांसमक्ष शस्त्र जप्त क रण्यात आले असून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला आणि जप्त मुद्देमाल सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी आणि वाल्मिक चव्हाण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.