ब्रिटिश लोकशाही, संसदीय व्यवस्था आणि जागतिक राजकीय विचारांच्या नव्या प्रवाहांचा घेतला सखोल अभ्यास
भुसावळ ( प्रतिनिधी )- सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील मधुकर नेवे यांनी १ जुलै २०२६ रोजी इंग्लंडमधील लंडन येथे आयोजित प्रतिष्ठित "History of Political Ideas Seminar" या आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभाग नोंदवून उत्तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. लंडन येथील Institute of Historical Research (IHR), Senate House, University of London येथे आयोजित या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये जगभरातील नामवंत प्राध्यापक, संशोधक, संशोधन विद्यार्थी आणि राजकीय विचारांचे अभ्यासक सहभागी झाले होते. या परिसंवादात लोकशाहीची उत्क्रांती, राज्यसंस्थेची संकल्पना, स्वातंत्र्य, समानता, न्याय, आधुनिक राजकीय सिद्धांत, उदारमतवाद, राष्ट्रवाद, संविधानवाद तसेच समकालीन जागतिक राजकारणातील बदल यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. सेमिनारदरम्यान प्रा. डॉ. नेवे यांनी विविध देशांतील विद्वानांशी संवाद साधून राजकीय विचारांच्या इतिहासाचा आधुनिक लोकशाही व्यवस्थेवर होणारा प्रभाव, संशोधनातील नवीन दिशा आणि राज्यशास्त्र विषयातील जागतिक घडामोडींचा अभ्यास केला. भारतीय राज्यघटना, संसदीय लोकशाही आणि भारतीय राजकीय विचार जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनेक संशोधन संकल्पना आणि दृष्टिकोनांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना यावेळी मिळाली. यापूर्वीही प्रा. डॉ. नेवे यांनी अर्जेंटिना, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आयोजित विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत संशोधन सादर केले आहे. त्यांच्या संशोधन कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, राज्यशास्त्र विषयातील जागतिक शैक्षणिक संवादात त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान प्रा. डॉ. नेवे यांनी ब्रिटिश संसदेची दोन्ही सभागृहे (House of Commons आणि House of Lords), Royal Courts of Justice, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान, London School of Economics (LSE), National Gallery तसेच विविध ऐतिहासिक आणि शैक्षणिक संस्थांना भेट देऊन ब्रिटिश संसदीय लोकशाही, न्यायव्यवस्था, संशोधन संस्कृती आणि सार्वजनिक प्रशासनाचा प्रत्यक्ष अभ्यास केला. या अभ्यास दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्यापनात, संशोधनात आणि राज्यशास्त्र विषयाच्या गुणवत्तावृद्धीसाठी करण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. नेवे यांनी सांगितले. प्रा. डॉ. नेवे यांच्या या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यशाबद्दल आमदार अमोल जावळे, सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, भालोदचे अध्यक्ष गणेश नेहेते, उपाध्यक्ष गोपाळ चौधरी, सचिव भास्कर पिंपळे, चेअरमन हेमलता ताई इंगळे, उपचेअरमन नारायण बापू चौधरी, प्राचार्य प्रा. डॉ. किशोर कोल्हे, मुख्याध्यापक आर. एस. जावळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलवंती बोरोले तसेच संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा. डॉ. नेवे यांच्या या सहभागामुळे कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद तसेच उत्तर महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्राला आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठाशी जोडण्यास बळ मिळणार असून, विद्यार्थ्यांना जागतिक संशोधन संस्कृतीची ओळख करून देण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.


