जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात बुधवारी रात्री हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील अनेक नागरिकांना जोरदार धडक बसली. या अपघातात दोन दाम्पत्यांसह एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून एकूण पाच जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणारी कार अचानक अनियंत्रित झाली आणि रस्त्यावरील नागरिकांना धडक देत पुढे गेली. अपघात इतका भीषण होता की काही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली. संतप्त नागरिकांचा रोष वाढत असल्याचे पाहून कार चालवणारा अल्पवयीन चालक वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाला. यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार ताब्यात घेतली असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या वाढत्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पालकांची निष्काळजीपणा यामुळे अशा घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.


