अधिक मासात सर्वश्रेष्ठ दान म्हणजे वृक्षदान; भूमातेवर वृक्ष लावून संगोपन करा – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी) – अधिक मासात केलेल्या दानधर्म, जप, उपासना आणि धार्मिक कार्यांना विशेष पुण्य प्राप्त होते. मात्र सध्याच्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर निसर्गदेवतेस प्रिय आणि समाजासाठी सर्वाधिक उपयुक्त असे दान म्हणजे वृक्षदान असल्याचे प्रतिपादन पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.

डॉ. पाटील म्हणाले की, अधिक मास हा साधारणपणे दर अडीच ते तीन वर्षांनी येतो. या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांसह दानधर्माची परंपरा आहे. परंतु वाढते तापमान, अनियमित पाऊस, ढगफुटीसदृश परिस्थिती, पूर, चक्रीवादळे आणि पर्यावरणाचा बिघडलेला समतोल यामुळे आज मानवासह संपूर्ण सजीवसृष्टी संकटात सापडली आहे. झाडांची मोठ्या प्रमाणावर झालेली घट ही या समस्यांमागील प्रमुख कारणांपैकी एक आहे.

त्यांनी सांगितले की, झाडे ही केवळ ऑक्सिजन देणारी साधने नसून ती देवत्वाची केंद्रे आहेत. भूमातेचे अस्तित्व टिकवण्यासाठी तसेच मानव, पशू-पक्षी आणि संपूर्ण सजीवसृष्टीच्या संरक्षणासाठी देशी वृक्ष तसेच विविध फळे-फुलांची झाडे लावणे काळाची गरज आहे.

यंदाचा अधिक मास १५ जूनपर्यंत असून पावसाळ्याच्या प्रारंभीचा हा काळ वृक्षलागवडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासमोर, दुकानासमोर, कार्यालय परिसरात, शेतात किंवा उपलब्ध मोकळ्या जागेत किमान एक तरी वृक्ष लावावा आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

“फक्त वृक्ष लावून थांबू नका, त्याचे संगोपनही करा. स्वतःला शक्य नसल्यास संगोपनासाठी आर्थिक मदत देऊनही वृक्षदान करता येऊ शकते. अधिक मासातील हे दान निसर्ग, समाज आणि भावी पिढ्यांसाठी सर्वश्रेष्ठ ठरेल,” असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले.

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत अधिक मासात वृक्षदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्रतर्फे करण्यात आले आहे.