भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील मोकाट कुत्र्यांच्या

वाढत्या उपद्रवामुळे एका निष्पाप बालकाचा बळी गेल्यानंतर अखेर भुसावळ नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. सातत्याने होणाऱ्या तक्रारी आणि आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बुधवारी (दि. ३) शहरात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ५०हून अधिक कुत्र्यांना पकडण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेचा प्रारंभ बुधवारी सकाळी नेहरू मैदान परिसरातील वाल्मीक चौकातून करण्यात आला.
नारायण नगर येथील तारकेश विशाल झोपे (९ वर्षे ६ महिने) हा २४ एप्रिल रोजी शाळेत जात असताना मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जळगाव व मुंबई येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान १३ मे रोजी त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली होती. तातडीने शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत होती.
या प्रकरणात संबंधित कुत्रा खन्ना कोळी यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातून कुत्रा पकडून नेताना कंत्राटदाराचे कर्मचारी
कचरा डेपो परिसरात उभारले निवारा गृह
परभणी येथील कंत्राटदार संस्थेकडे हे काम सोपविण्यात आले असून, पुढील १५ दिवस शहरभर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या भागांतून सर्वाधिक तक्रारी प्राप्त होतील त्या भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कचरा डेपो परिसरात पकडलेल्या कुत्र्यांसाठी तात्पुरते निवारागृह उभारण्यात आले आहे. पकडलेल्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
दरम्यान, पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर बनल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बालकाच्या मृत्यूनंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी ही मोहीम केवळ तात्पुरती न राहता शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भुसावद्ध नगरपरिषद, भुसावळ
शहरातील ज्या भागात कुत्र्यांचा जास्त त्रास आहे, तिथे टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवून कुत्री पकडण्यात येतील. तसेच, पकडलेल्या कुत्र्यांची योग्य ती व्यवस्था निर्बीजीकरण आणि पुनर्वसन पालिकेमार्फत करण्यात येईल.
लक्ष्मण चावरिया, आरोग्य निरीक्षक, नगरपालिका, भुसावळ
नगराध्यक्षांनी घेतला मोहिमेचा आढावा
प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, भाजप गटनेते युवराज लोणारी, पुरुषोत्तम नारखेडे, अॅड. बोधराज चौधरी, नगरसेविका शोभा इंगळे, प्राची पाटील, सोनम इंगळे, देवा वाणी, नितीन धांडे, किरण कोलते व कैलास पाटील यांनी दिवसभर या मोहिमेचा आढावा घेतला.



