कोल्हापूर – राज्यात मुली व महिला अत्याचार आणि हिंसेच्या घटना कानावर येत असताना पुन्हा अशीच धक्कादायक हादरवणारी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर मुरगूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी परिसरातील पीडित तरुणी आणि मुख्य आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी ओळख निर्माण झाली होती. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमसंबंधात झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, तरुणीचे काही खासगी फोटो आणि व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. याच व्हिडिओ फोटोचा आधार घेत पीडितेला धमकावून तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याची बाब पीडित तरुणीने तक्रारीत नमूद केली आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुणीला या आरोपी तरुणांनी खासगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची भीती दाखवून वारंवार मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. या दबावाचा गैरफायदा घेत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या धक्कादायक प्रकराबाबत पीडित तरुणीने अखेर धाडस दाखवत संपूर्ण प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार मिळाल्यानंतर मुरगूड पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्याविरोधात विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील मुख्य आरोपीचा फोटोग्राफी व्यवसाय असल्याची माहिती समोर आली आहे. ओळखीच्या माध्यमातूनच त्याचा आणि पीडित तरुणीचा संपर्क वाढल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून मोबाईल फोन, डिजिटल पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी सुरू आहे.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर राधानगरी परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत. दरम्यान न्यायालयाने 6जून पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहे.


