शिरपूर शिरपूर तालुका पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी जे वी

शनिवार (दि. 23 मे 2026) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन इसम मध्यप्रदेशातील उमर्टी परिसरातून शस्त्रे व काडतुसे घेऊन आंबेमार्गे शिरपूरकडे येत आहेत. या माहितीच्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचला.
पोलिसांचे पथक आंबे गाव परिसरात पोहोचले असता दगडी बाकड्याजवळ दोन संशयित इसम उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांची गाडी पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विकास उर्फ पल्लुराम मनोज घारु (वय 30, रा. बाजीराव नगर, गणपती मंदिराजवळ, नालंदा किराणा दुकानामागे, येवला, जि. नाशिक) आणि रावसाहेब अशोक मोरे (वय 29, रा. निमगाव, ता. येवला, जि. नाशिक) अशी आहेत.
आरोपींकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे (पिस्तुले), सहा जिवंत काडतुसे आणि दोन अतिरिक्त मॅगझिन असा एकूण 1 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय ढिवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.
पथकाने बजावली महत्त्वाची भूमिका
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक मनोज कचरे, हवालदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, राजू ढिसले, कॉन्स्टेबल योगेश मोरे, विजय ढिवरे, स्वप्निल बांगर तसेच चालक अल्ताफ मिर्झा आणि चालक कामकी यांच्या पथकाने सहभाग घेतला.


